२०२६–२७
म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
दि. २१ जून २०२६ रोजी म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पुणे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या NCC विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात NCC शिक्षक श्री. सुनील जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली NCC चे ६४ विद्यार्थी सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक योगाभ्यासाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम तसेच सूर्यनमस्कार करून योगाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व योग मार्गदर्शक श्री. धनराज प्रजापती यांनी योगाचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी, मन प्रसन्न आणि व्यक्तिमत्त्व अधिक सक्षम बनते, असा संदेश त्यांनी दिला.
या प्रसंगी विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व योग प्रशिक्षक कु. हर्षदा गुजले, कु. जान्हवी पाटील आणि कु. रेशम पड्याळ यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योग दिनाचा संदेश आत्मसात केला.
या उपक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ तसेच शालेय पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. भारताने जगाला दिलेल्या योग या अमूल्य परंपरेचा सन्मान करत विद्यालयाने राष्ट्रीय आणि जागतिक आरोग्य चळवळीत आपला सक्रिय सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, आत्मअनुशासन आणि सकारात्मक विचारांची जडणघडण व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ . विमलाबाई गरवारे प्रशालेत विद्यार्थिनींना दिले जाणार स्वसंरक्षणाचे धडे ..
दिनांक 18 जून 2026 रोजी सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनी मर्यादित यांच्या सीएसआर निधीतून तसेच वीर रणांगणा एज्युकेशन फाउंडेशन यांच्या माध्यमातून शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण उपक्रमांतर्गत लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा आदी मैदानी खेळांचे प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले .
यावेळी विद्यार्थिनींना विविध युद्धकला प्रकारांचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये स्वसंरक्षणाची भावना जागृत करणे व शारीरिक तंदुरुस्ती वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. काळाची गरज ओळखून हा उपक्रम प्रशालेत नियमितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रसंगी फाउंडेशनचे सर्व सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. रोहिदास भारमळ सर, उपमुख्याध्यापिका सौ. सुनिता गायकवाड मॅडम, पर्यवेक्षिका सौ. शिंदे मॅडम तसेच सर्व शिक्षक इयत्ता आठवी नववी चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रात्यक्षिकात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत व व्यायामशाळा उद्घाटन
वीज बचत जनजागृती कार्यक्रम
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला व उच्च माध्यमिक विद्यालय, पुणे येथे शनिवार, दिनांक ११ जुलै २०२६ रोजी विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने "वीज बचत जनजागृती कार्यक्रम" आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रशालेचे शिक्षक श्री. अनंत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना वीज बचतीचे महत्त्व अतिशय सोप्या व प्रभावी पद्धतीने समजावून सांगितले. त्यांनी प्रत्यक्ष वीज बिलाचे नमुने दाखवून त्यावरील ग्राहक क्रमांक, मीटर रीडिंग, मागील व सध्याचे रीडिंग, वापरलेल्या युनिट्स, वीजदर, बिलाची रक्कम आणि बिलातील विविध माहिती कशी वाचावी, याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना शाळेत तसेच घरामध्ये वीज बचत करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपायांची माहिती देण्यात आली. विनाकारण दिवे, पंखे, संगणक व इतर विद्युत उपकरणे सुरू ठेवू नयेत, एलईडी दिव्यांचा वापर करावा, नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त उपयोग करावा, आवश्यक नसताना चार्जर व इतर उपकरणांचे प्लग काढावेत तसेच प्रत्येकाने ऊर्जा बचतीची सवय लावल्यास पर्यावरण संरक्षणासह आर्थिक बचतही होऊ शकते, असे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारले. वीज बचतीविषयीचे त्यांचे गैरसमज दूर झाले तसेच ऊर्जा संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याची जाणीव त्यांना झाली.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वीज बचतीबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत झाली. त्यांनी आपल्या घरामध्ये आणि परिसरात ऊर्जा बचतीचे नियम पाळण्याचा संकल्प केला.
पालखी सोहळा व ग्रंथदिंडीने दुमदुमली सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला – हरिनामाच्या गजरात रंगले बाल वारकरी
सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पालखी सोहळा व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. "ज्ञानोबा माऊली तुकाराम" या जयघोषात संपूर्ण परिसर हरिनामात दंग झाला होता.
या सोहळ्यात इयत्ता5 वी ते 7 वी चे विद्यार्थी विठ्ठल-रुक्मिणी व संतांची वेषभूषा करून सहभागी झाले होते. काही विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव व संत तुकाराम यांचे रूप धारण करून वारकरी परंपरेचे सजीव चित्र उभे केले. सर्वजण टाळ-मृदंगाच्या गजरात “विठ्ठल! विठ्ठल!” म्हणत भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात सहभागी झाले.
पालखी सोहळ्याची मिरवणूक काढण्यात आली. पालखीबरोबरच ग्रंथदिंडीचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये संतांच्या ग्रंथांचे पूजन करून त्यांची मिरवणूक काढण्यात आली.
प्रशालेच्या शिक्षिका सौ मुक्ता कौलगुड मॅडम यांनी वारीची माहिती सांगितली . स्वप्नाली देशपांडे मॅडम व तिजारे सर यांच्या सोबत विद्यार्थ्यांनी अभंग गायिले .
पारंपरिक ‘फुगड्या’ घालून, भजन गाऊन वातावरण भक्तिमय केले. या सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचे महत्त्व व संस्कृतीची ओळख पटली.
संपूर्ण कार्यक्रम अत्यंत आनंदात व उत्साहात पार पडला.
पाबळ येथील खुले विज्ञान प्रदर्शन मुलांना ठरली बौद्धिक मेजवानी
बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी म ए सो विमलाबाई गरवारे प्रशाला व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने गरवारे प्रशालेतील इयत्ता नववी शिवनेरीच्या 50 विद्यार्थ्यांनी व तीन शिक्षकांनी विज्ञान आश्रम पाबळ येथे भेट दिली.
प्रदर्शनामध्ये विज्ञान आश्रमात विकसित करण्यात आलेली विविध तंत्रज्ञानाधारित उपकरणे, ग्रामीण विकासासाठी उपयुक्त संशोधन, कृषी क्षेत्रातील नवकल्पना, ऊर्जा, पाणी व्यवस्थापन, अन्न प्रक्रिया, अभियांत्रिकी, उद्योजकता आणि कौशल्याधारित शिक्षण यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल्स आणि प्रयोग प्रत्यक्ष पाहून त्यामागील वैज्ञानिक तत्त्वे समजून घेतली.
सदर भेटीमध्ये मुलांना ग्रामीण भागामध्ये आवश्यक विविध विषयांवरील संशोधन प्रकल्प पाहण्याची संधी मिळाली. यामध्ये पाणी शुद्धीकरणापासून ते कृषी विषयक तसेच तांत्रिक विषयापासून ते व्यावसायिक विषयापर्यंत विविध संशोधन प्रकल्प व त्याच्यात असणाऱ्या भविष्यातील संधी विद्यार्थ्यांनी अनुभवल्या. विज्ञान विषयाचा सामाजिक प्रगतीसाठी होणारा उपयोग व त्याचे उत्तम उपयोजन याचा विद्यार्थ्यांना अभ्यास करता आला. डॉ. एस एस कलबाग त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना सदर प्रदर्शन खुले करण्यात आले होते. देशाचे भावी वैज्ञानिक घडण्यासाठी व शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी सदर भेट अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. निश्चितच सदर विज्ञान प्रदर्शन मुलांच्या भावी जीवनासाठी दिशादर्शक ठरेल.
गरवारे प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बनवल्या आकर्षक रॉकेटच्या प्रतिकृती
राष्ट्रीय अंतराळ दिवसाच्या निमित्ताने गरवारे प्रशालेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी व विज्ञान मंडळाच्या सदस्यांनी राष्ट्रीय अंतराळ दिवसानिमित्ताने रॉकेटच्या पर्यावरण पूरक व आकर्षक प्रतिकृती बनविल्या. औचित्य होते याच दिवशी भारताचे चांद्रयान चंद्रावर पोहोचले. डॉक्टर संजय पुजारी यांनी विद्यार्थ्यांना रॉकेटची सखोल माहिती व कार्य समजावून सांगितले . इस्रोच्या माध्यमातून भारताने आतापर्यंत केलेल्या विविध अवकाश मोहिमा यांचे व्हिडिओ ही विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. भारताने आत्तापर्यंत केलेल्या चांद्रयान मोहिमा व रॉकेट कशाप्रकारे काम करते हे अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये डॉक्टर पुजारी यांनी विज्ञान मंडळाच्या सर्व सदस्यांना समजावून सांगितले. प्रतिकृती तयार करताना विद्यार्थ्यांनी सर्व पर्यावरण पूरक साहित्याचा वापर केला. प्रतिकृती तयार करताना विद्यार्थी रमून गेले होते. अशा स्वरूपाच्या कार्यशाळेमधूनच भारताचे भविष्यकालीन शास्त्रज्ञ तयार होण्यास मदत होणार आहे. सदर कार्यशाळा गरवारे प्रशाला विज्ञान मंडळ व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली.
आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक व मार्गदर्शन......
प्रशालेमध्ये दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आपत्तीच्या प्रसंगी घाबरून न जाता प्रसंगावधान राखून योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळता यावी व बचावकार्याची प्राथमिक माहिती मिळावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमास महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळ सदस्य श्री. दिलीप शेठ, एज्युकेशन सोसायटी प्रकल्प समन्वयक डॉ. दत्तात्रय नाईक, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव डॉ. विनायक शुक्ल, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ, उपमुख्याध्यापिका सौ. सुनिता गायकवाड, पर्यवेक्षिका सौ. जयश्री शिंदे, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रात्यक्षिकामध्ये अग्निशमनासाठी वापरण्यात येणारी विविध साधने, Fire Extinguisher चा योग्य वापर, पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर, अडकलेल्या पक्ष्याची सुरक्षित सुटका, लोखंडी गज कापण्यासाठी कटर, लाकूड कापण्याचे यंत्र, ऑक्सिजन सिलेंडर आदी साधनांची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. प्रत्येक साधनाचा उपयोग, कार्यपद्धती आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
आगीच्या प्रसंगी घाबरून न जाता सुरक्षित अंतर राखणे, योग्य पद्धतीने Fire Extinguisher चा वापर करणे, तसेच आवश्यकतेनुसार ओल्या कपड्याचा वापर करून सुरक्षितता राखणे याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रात्यक्षिकामुळे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे व्यावहारिक ज्ञान, प्रसंगावधान, शिस्त, सहकार्य आणि सुरक्षिततेचे महत्त्व समजले.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय नेत्र दीपक प्रात्यक्षिके सादर केले. त्यात विद्यार्थी शिक्षक सर्वजण सहभागी झाले.
सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील विद्यार्थ्यांशी साधला शास्त्रज्ञानी संवाद.




































































