गुणगौरव सोहळा : दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी सन्मान

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा ! 💐💐

दि. 27 जून2026 (शनिवार) : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव समारंभ’ अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि वातावरणात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव, त्यांच्या मेहनतीचे कौतुक आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणारा हा सोहळा .
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानदेवता सरस्वती पूजनाने व स्वागत गीताने करण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक
मा. श्री. रोहिदास भारमळ सर यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे आणि सर्व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. यशामागील सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हेच विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे गमक असल्याचे त्यांनी नमूद केले.

ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका सौ. अपर्णा भणगे मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

– इयत्ता दहावी : प्रसाद जनार्दन झोरे — ९६.००%
– इयत्ता बारावी (विज्ञान शाखा) : सचिन राहुल भिसे — ८४.१७%
– इयत्ता बारावी (वाणिज्य शाखा) : साक्षी संजय काटकर — ८६.००%
गुणवंत विद्यार्थ्यांचे मनोगत.
प्रसाद जनार्दन झोरे, सचिन राहुल भिसे आणि साक्षी संजय काटकर या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळेप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य, नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन आणि कठोर परिश्रम यांमुळे हे यश संपादन करता आल्याचे त्यांनी सांगितले. कनिष्ठ विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहून सातत्याने प्रयत्न करावेत, असा संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या १९८८ च्या बॅचच्या माजी विद्यार्थिनी व “जागर” नाट्यसंस्थेतील संवेदनशील अभिनेत्री सौ. ऋता पंडित यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले की, “या शाळेने मला माझ्या कलागुणांना वाव देणारे पहिले व्यासपीठ दिले. त्यामुळे मी या संस्थेची सदैव ऋणी आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “जीवनात यश आणि अपयश दोन्हींचे समतोलपणे स्वागत करा. समाजातून खूप काही शिकता येते. साधेपणातच खरी शिस्त आणि संस्कार दडलेले असतात. गुणवत्तेबरोबरच खेळ, वक्तृत्व, सांस्कृतिक उपक्रम आणि माणसे जोडण्याची कला आत्मसात करा. मोठी स्वप्ने पाहा, आव्हानांना सामोरे जा, प्रत्येक संधीचा उपयोग करा, अनुभवातून शिका, प्रश्न विचारण्याची सवय लावा आणि विविध क्षेत्रांची माहिती मिळवा. करिअर हा केवळ व्यवसाय नसून आयुष्य आनंदाने जगण्याचा मार्ग आहे.” त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रशालेचे महामात्र डॉ. निर्भय पिंपळे सर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “शैक्षणिक गुणवत्ता आणि उत्तम संस्कार यांची सांगड घातली तर यश निश्चित मिळते. विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच चारित्र्य, सामाजिक बांधिलकी आणि मूल्यांची जपणूक करत यशाची ही परंपरा पुढे नेली पाहिजे.”

Scroll to Top