२०२६–२७
पावनखिंड दौड — राष्ट्रभक्ती, इतिहासप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संगम
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला, डेक्कन जिमखाना, पुणे येथे दिनांक १३ जुलै २०२६, सोमवार रोजी "पावनखिंड दौड" या प्रेरणादायी उपक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. हा उपक्रम केवळ धावण्याची स्पर्धा नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील शौर्य, त्याग आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनामनांत जागवणारा एक ऐतिहासिक व संस्कारमय उपक्रम ठरला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातील अत्यंत गौरवशाली प्रसंग म्हणजे पावनखिंडीचा संग्राम. इ.स. १६६० मध्ये शिवाजी महाराज विशाळगडाकडे सुरक्षित प्रस्थान करत असताना शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या मावळ्यांसह प्राणांची पर्वा न करता शत्रूला खिंडीत रोखून धरले. त्यांच्या अद्वितीय पराक्रमामुळे महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहोचले आणि स्वराज्याचे रक्षण झाले. या अमर बलिदानाची स्मृती जागवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, धैर्य, नेतृत्वगुण व इतिहासाबद्दल अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने या दौडीचे आयोजन करण्यात आले.
दौडीची सुरुवात सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या आवारातून झाली. विद्यार्थ्यांनी खंडोजी बाबा चौक – गुडलक चौक – फर्ग्युसन रोड – बी.एम.सी.सी. कॉलेज रोड – गोखले इन्स्टिट्यूट मार्गे – फर्ग्युसन कॉलेज – हनुमान टेकडी असा उत्साहपूर्ण मार्ग पूर्ण केला. संपूर्ण मार्गावर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, उत्साह आणि राष्ट्रप्रेमाची भावना प्रकर्षाने जाणवत होती.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थीना, इतिहास व साहित्यप्रेमी अभिजित अंबेकर याने शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनकार्यावर प्रभावी व्याख्यान सादर केले. विद्यार्थ्यांना स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाचे महत्त्व समजले आणि इतिहासाविषयी अभिमानाची भावना अधिक दृढ झाली.
दौडीचे औचित्य साधून हनुमान टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रप्रेमाबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा हा स्तुत्य प्रयत्न होता. तसेच विद्यार्थ्यांना बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावरील माहितीपूर्ण चित्रफीत दाखविण्यात आली. या चित्रफितीमुळे विद्यार्थ्यांना इतिहासाचा जिवंत अनुभव मिळाला आणि त्यांच्यात प्रेरणा, जिद्द व देशसेवेची भावना अधिक बळकट झाली.
"पावनखिंड दौड" हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात शौर्य, त्याग, राष्ट्रभक्ती, इतिहासप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांची प्रभावी रुजवण होत राहील. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये सुदृढ शरीर, सशक्त मन आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा जागृत होईल.
म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
दि. २१ जून २०२६ रोजी म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पुणे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या NCC विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात NCC शिक्षक श्री. सुनील जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली NCC चे ६४ विद्यार्थी सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक योगाभ्यासाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम तसेच सूर्यनमस्कार करून योगाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व योग मार्गदर्शक श्री. धनराज प्रजापती यांनी योगाचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी, मन प्रसन्न आणि व्यक्तिमत्त्व अधिक सक्षम बनते, असा संदेश त्यांनी दिला.
या प्रसंगी विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व योग प्रशिक्षक कु. हर्षदा गुजले, कु. जान्हवी पाटील आणि कु. रेशम पड्याळ यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योग दिनाचा संदेश आत्मसात केला.
या उपक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ तसेच शालेय पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. भारताने जगाला दिलेल्या योग या अमूल्य परंपरेचा सन्मान करत विद्यालयाने राष्ट्रीय आणि जागतिक आरोग्य चळवळीत आपला सक्रिय सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, आत्मअनुशासन आणि सकारात्मक विचारांची जडणघडण व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.
व्यसनमुक्ती जनजागृती अभियान
दिनांक 27 जून 2026 रोजी आपण आमच्या उच्च माध्यमिक विद्यालयात व्यसनमुक्ती जनजागृती अभियान यांतर्गत इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्यत्वे करून या जेन झी पिढीत असलेल्या मोबाईलच्या व्यसना संदर्भात जी जनजागृती करण्याचा प्रयत्न डॉक्टर पियुष आणि आपण केला ते विशेष उल्लेखनीय होते .
या कार्यक्रमास माननिय माध्यमिक उपशिक्षण अधिकारी, श्रीमती कुमावत मॅडम याही उपस्थित होत्या त्यांनी विद्यार्थ्यांचे पालक यानात्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शपथ दिली गेली.
























