महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी विद्यार्थी, माजी पालक, देणगीदार व ख्यातनाम व्यावसायिक अरूण जगन्नाथ देवस्थळे यांचे शुक्रवार, दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते.
अरुणराव देवस्थळे यांचे वडील श्री. जगन्नाथ भास्कर देवस्थळे हे मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत शिक्षक होते. तर ते स्वतः मएसो मुलांचे विद्यालय (पेरूगेट भावे स्कूल) चे माजी विद्यार्थी आणि सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेचे माजी पालक होते. त्यामुळे त्यांचा संस्थेशी दीर्घकाळपासून ऋणानुबंध होता.
त्यांनी आपले आई-वडील श्री. जगन्नाथ भास्कर देवस्थळे व सौ. सिंधुताई जगन्नाथ देवस्थळे यांच्या स्मरणार्थ १९७७ पासून प्रशालेतील आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यास सुरवात केली. तसेच त्यांनी इ. १० वी आणि इ. १२ वी च्या परीक्षेत उत्तम गुण मिळवणाऱ्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यास प्रारंभ केला. मएसो भावे प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी देखील पारितोषिके ठेवली आहेत. याशिवाय त्यांनी संस्थेला वेळोवेळी देणगी दिली आहे.
बांधकाम व्यावसायिक म्हणून पवना धरणाच्या पायलट चॅनेलचे बांधकाम आणि ओंकारेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम हे त्यांच्या कारकिर्दितील मानबिंदू म्हणता येतील.
प्रशालेतर्फे अरुणराव देवस्थळे यांना भावपूर्ण आदरांजली!