तृणधान्य जनजागरण प्रदर्शन
सोमवार दिनांक 29/1/2024 रोजी तृणधान्य जनजागरण प्रदर्शन भरविण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्याच प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री. निखिल जोशी (1997 च्या बॅचचे ) आणि जेडब्ल्यू कन्सल्टन्सी चे संचालक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाला समितीचे महामात्र श्री. सुधीर गाडे, शिक्षण प्रबोधिनीचे उपसंचालक श्री.केदार तापीकर तसेच बालशिक्षण मंदिर भांडारकर रोड प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम उपस्थित होत्या.
याप्रसंगी अन्नपूर्णा देवीचे पूजन करून मिलेट गीताने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत झाले. तसेच चहापानात देखील तृणधान्यांचा समावेश असलेला नाष्टा देण्यात आला. नाचणी, ज्वारी, बाजरी, वरई, राजगिरा अशा तृणधान्यांनी सजलेले हे प्रदर्शन खूपच देखणे होते. इयत्ता पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात आपापल्या धान्याविषयी माहिती विस्तृत स्वरूपात आलेल्या पाहुण्यांना सांगितली. तसेच शिक्षक, पालक यांनी विविध तृणधान्यांपासून बनलेले पदार्थ विक्रीसाठी व प्रदर्शनामध्ये ठेवलेले होते. याप्रसंगी विविध वृत्तपत्रांचे पत्रकार देखील उपस्थित होते. तसेच उद्घाटनाच्या वेळी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी तृणधान्यावर आधारित मिलेट क्रांती नावाचे पथनाट्य सादर केले. परिसरातील शाळेच्या विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी 2 दिवस खुले ठेवण्यात येणार आहे.
मएसो च्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचे निवासी शिबिराची सांगता
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांतील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी शिबीर सौ. विमलाबाई प्रशालेत २ व ३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये मएसो च्या तज्ञ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
‘मएसो’चे योगदान देश कधीही विसरू शकणार नाही
– मा. नितीन गडकरी
“महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे योगदान फार मोठे आहे, महाराष्ट्र आणि देश ते कधीही विसरू शकणार नाही. आपला देश स्वावलंबी, समृद्ध, सामर्थ्यसंपन्न, शक्तीशाली व्हावा आणि जगातील आर्थिक महासत्ता व्हावा अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे. ती पूर्ण होण्यासाठी नेमका जीवन दृष्टीकोन बाळगून काम करण्याची गरज आहे. भविष्यातील आपला देश घडवण्यासाठी आवश्यक असलेली दिशा आपल्या देशाला द्यायची आहे, तेच काम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी करत आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी आज केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आज (मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२०) मा. गडकरी यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. श्री. प्रदीप नाईक तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि मा. श्री. अभय क्षीरसागर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर गाडे उपस्थित होते.
मयूर कॉलनीत असलेल्या मएसो ऑडियोरिअममध्ये कोविड -१९ महामारीच्या संदर्भातील सर्व शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत निमंत्रित मान्यवरांच्या मर्यादित उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
मा. गडकरी आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर याद्रष्ट्या व्यक्तींनी देश पारतंत्र्यात असताना स्वदेशी शिक्षणाची गरज लक्षात घेऊन देशातील भावी पिढीवर संस्कार करून स्वावलंबी, संपन्न, समृद्ध आणि शक्तीशाली राष्ट्र निर्माण व्हावे या भावनेतून या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. संस्थेचा १६० वर्षांचा इतिहास हा पिढी घडवण्याचा इतिहास आहे.
लहान विद्यार्थ्यांवर संस्कार करून त्यांचे व्यक्तिमत्व घडविणे आणि त्याला एक आदर्श माणूस बनवणे हे समाजासाठी आवश्यक असते. ज्ञान ही अतिशय प्रभावी शक्ती आहे. ज्ञानाच्या आधारे संपत्तीची निर्मिती करणे आवश्यक असल्याने आत्मनिर्भर भारताची निर्मिती करण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे. या ज्ञानाचे संवर्धन करण्यासाठी शालेय स्तरापासून उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी हे ज्ञान मिळवून आपल्या देशाला जगात नाव मिळवून दिले आहे. पुणे हे खऱ्या अर्थाने विद्येचे माहेरघर आहे. पुण्यातील लाखो विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत, याचे कारण पुण्यातील शिक्षणसंस्था. पुण्यातील शिक्षण संस्थांनी सुसंस्कारित आणि चांगल्या पिढ्या घडविल्या आहेत. पुण्यात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती राहातात. डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षणाची गुणवत्तादेखील वाढली आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे हे महत्त्वाचे आहे पण त्याचबरोबर दर्जेदार शिक्षण मिळणे हेदेखील तितकेच महत्वाचे आहे. विविध क्षेत्रात प्रगती आणि विकास करायचा असेल तर ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, सृजन, उद्योजकता, शास्त्र, तंत्रज्ञान आणि संशोधन या सर्वच क्षेत्रात ज्ञान मिळविण्याची गरज आहे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने हे ज्ञान उपलब्ध करून दिले आहे. एक मोठी शक्ती एवढ्याच दृष्टिकोनातून ज्ञानाचा विचार करून चालणार नाही. त्याच्याबरोबर मूल्याधिष्ठित जीवनपद्धती, कुटुंब पद्धती, शिक्षण पद्धती ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. आपल्याला ज्ञान आणि संपत्ती दोन्ही मिळवायचे आहे. संपत्तीबरोबरच मूल्याधिष्ठित व्यक्तिमत्त्व निर्माण करण्याची आवश्यकता आहे. विश्वकल्याणाचा विचार देणारी भारतीय संस्कृती आणि इतिहास, परंपरा यांचे हेच वैशिष्ट्य आहे की, आपल्या संस्कार पद्धतीमुळे आदर्श नागरिक देखील घडतात. यामध्ये ‘मएसो’ सारख्या शिक्षण संस्थांचा फार मोठा वारसा आहे.
आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल, त्याचप्रमाणे फार मोठ्या संख्येने शिक्षणासाठी परदेशांमध्ये जात असलेल्या आपल्या देशातील विद्यार्थ्यांना आपल्याच देशात शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे ही क्षमता आहे, मात्र तशी महत्त्वाकांक्षा आपण बाळगली पाहिजे. शिक्षण क्षेत्रात पवित्र विचाराने, निस्पृह, निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्यांची गती कमी आहे, ही खेदाची बाब आहे. चांगल्या माणसाचा चांगुलपणा समाजात जेव्हा प्रस्थापित होईल तेव्हाच समाज बदलेल. त्यामुळे निस्पृह भावनेने शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती निर्माण करणे, त्यातून चांगल्या समाजाची निर्मिती करणे आणि एका चांगल्या समाजातून एक चांगले राष्ट्र निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जीवननिष्ठा आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्याप्रमाणेच अनेक महापुरुषांच्या स्वप्नातील सुखी, समृद्ध, संपन्न, स्वावलंबी, आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी त्यांच्या विचारांच्या आधारावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या शिक्षण संस्था भविष्याचा वेध घेत ज्ञानयोगी तयार करताना, त्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करताना, संस्काराद्वारे त्यांच्यातील माणूसपण जोपासून चांगले नागरिक घडवण्याचा प्रयत्न करत आहेत ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी राष्ट्रीय पुनर्निमाणात योगदान देत राहील याचा मला विश्वास आहे.
संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, ज्ञानातून मिळणारी शक्ती विकसित करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्यविकास इ. माध्यमातून अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले.
संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभारप्रदर्शन तर प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
नवे शैक्षणिक धोरण हा आत्मनिर्भर भारताचा पाया
– केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. पोखरियाल
“शिक्षण हा समाजाचा कणा आहे, त्यामुळे भारतकेंद्रीत शिक्षण हा हेतू डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० तयार करण्यात आले आहे. या धोरणामुळे देशातील भावी पिढी स्वावलंबी, चारित्र्यवान आणि सामर्थ्यसंपन्न होईल. हे धोरण आत्मनिर्भर भारताचा पाया रचणारे आहे. देशाने एकमुखाने या धोरणाचे स्वागत केले आणि त्यातील वैशिष्ट्यांमुळे जगातील अनेक देशांनी त्यांचे शिक्षण धोरण ठरविण्यासाठी भारताकडे सहकार्य मागितले आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री मा. डॉ. रमेश पोखरियाल जी ‘निशंक’ यांनी केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आज (गुरुवार, दि. १८ नोव्हेंबर २०२०) डॉ. पोखरियाल यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. श्री. प्रदीप नाईक तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि मा. श्री. अभय क्षीरसागर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर गाडे उपस्थित होते.
डॉ. पोखरियाल आपल्या व्याख्यानात म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या बहुमुखी आणि बहुआयामी संस्था राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे आधारस्तंभ ठरतील. १६० वर्षापूर्वी स्वदेशी शिक्षणाचे महत्व ओळखून देशप्रेम आणि समर्पण भावनेतून शिक्षण संस्था सुरू करणे ही घटनाच विलक्षण आहे. राष्ट्रीय शिक्षणाचा संस्कार देणाऱ्या या संस्थेत तयार झालेले विद्यार्थी ज्या-ज्या क्षेत्रात गेले तिथे त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले.
पाश्चिमात्य विचारसरणी जगाकडे बाजार म्हणून बघते आपण मात्र संपूर्ण जगाला आपले कुटूंब मानतो. त्यामुळे आपली भावना जगाच्या कल्याणाची असते. या आपल्या शिकवणुकीमुळे आज जग अचंबित झाले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे मुल्याधिष्ठीत शिक्षणावर भर देणारे व्यापक आणि संपूर्ण परिवर्त घडवून आणणारे धोरण आहे. ते तयार करत असताना समाजातील सर्व घटकांशी विचारविनिमय करण्यात आला. सर्वांची मते विचारात घेण्यात आली. त्यामुळे हे शिक्षण धोरण सरकारने नाही तर समाजाने तयार केलेले आहे. व्यक्ती आपल्या मातृभाषेतूनच अधिक चांगल्या प्रकारे अभिव्यक्त होऊ शकतो आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. त्यामुळे या धोरणात
मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यावर जोर देण्यात आला आहे. त्याचबरोबर आपल्या देशातील २२ प्रादेशिक भाषांपैकी कोणतीही एक भाषा विद्यार्थ्याने शिकावी असा आग्रह आहे. त्यामुळे भाषांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होणार आहे. हे करत असताना इंग्रजी भाषेला कोणत्याही प्रकारे विरोध करण्यात आलेला नाही. जपान, जर्मनी, इस्राईल या देशांमध्ये मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते, परिणामी ज्ञान, विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात या देशांनी विकास साधला आहे.
दीर्घ कालावधीनंतर देशात नवे शैक्षणिक धोरण तयार झाल्याची चर्चा होते. प्रत्यक्षात लॉर्ड मॅकॉलेने देशातील समृद्ध शिक्षण परंपरा, भाषा आणि संस्कृति उद्धवस्त करण्यासाठी १५० वर्षांपूर्वी तयार केलेल्या धोरणानंतर खऱ्या अर्थाने भारतीय जीवनमूल्यांवर आधारलेले हे पहिलेच शैक्षणिक धोरण आहे. ते सर्वसमावेशक आणि प्रभावी आहे.
संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम्’ ची शिकवण माणूस घडवणारी आहे, माणसाचे मशिन बनवणारी नाही. लॉर्ड मॅकॉले नव्या शिक्षण पद्धतीच्या आधारे जेव्हा देशाच्या संस्कृतीवर आघात करत होता, त्याच कालखंडात राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात व्यक्त झालेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात नक्कीच सहयोग देईल.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले.
संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आभारप्रदर्शन तर डॉ. बाबासाहेब गव्हाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.