महाराष्ट्र एजयुकेशन सोसायटीची सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला ठरली औंध क्लस्टर विभागात अव्वल
पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवत्ता संवर्धन अभियान 2024-25 मध्ये सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेने औंध क्लस्टर विभागात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.
दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी झालेल्या शालेय तपासणीत विविध क्षेत्रांमध्ये शाळेने उत्कृष्ट कामगिरी केली. भौतिक सुविधा, प्रशासन, शैक्षणिक अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, शालेय विभाग व्यवस्थापन, गुणवत्ता संवर्धन आणि विशेष उपक्रम या सर्व मापदंडांमध्ये शाळेने उच्च गुण प्राप्त केले. शाळेच्या या यशस्वी कामगिरीमागे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शालेय व संस्था पदाधिकारी, माजी विद्यार्थी आणि पालक या सर्व घटकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ म्हणाले, “हे यश सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. आमच्या शाळेतील प्रत्येक घटकाने केलेल्या अथक परिश्रमांचे हे प्रतिबिंब आहे. आम्ही यापुढेही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू.” शालासमिती अध्यक्ष मा.श्री. अजय पुरोहित व महामात्र श्री.निर्भय पिंपळे यांनी शाळेच्या कार्याबद्दल दिलेल्या संदेशात म्हणाले, “सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या या यशासाठी मी शाळेतील सर्व घटकांचे, विशेषतः शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि माजी विद्यार्थ्यांचे आभार मानतो. हे यश आम्ही मिळवले ते सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांनी आणि अथक परिश्रमांनी. शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्कृष्ट कार्य केले आहे. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता केवळ शाळेतील कार्यक्षमतेवर आधारित नाही, तर यामध्ये माजी विद्यार्थ्यांचे,पालकांचे, विद्यार्थ्यांचे आणि शाळेतील प्रत्येक व्यक्तीचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भविष्यकाळात देखील शाळेचा प्रत्येक घटक विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी कटिबद्ध राहील.”